न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ एप्रिल २०२०) :- हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स कंपनीला (‘एचए’) केंद्र सरकारने १६३ कोटी ८५ लाख रुपयांची मदत कंपनीला केली आहे. या रकमेतून ५०१ कामगारांचे फेब्रुवारी २०२० पर्यंतचे २९ महिन्यांचे थकीत वेतन आणि ११६ कामगारांना मार्च २०२० अखेरचे स्वेच्छानिवृत्तीचे लाभ देण्यात आले आहे. ‘एचए’ मजदूर संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारने जुलै २०१९ मध्ये मंजूर झालेल्या २८० कोटी १५ लाख मदत निधीतील उर्वरित १६३ कोटी ८५ लाखांचा टप्पा कंपनीला दिला आहे.
कोरोना विषाणूचे महाभयंकर संकट दूर करण्यासाठी कामगारांची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मदत केल्यानिमित्त हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) मजदूर संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आभार मानले आहे.
तसेच अर्थमंत्री निर्मला सितारामण, रसायन मंत्री सदानंद गौंडा, राज्यमंत्री मनसुख मांडविया, एचएचे अध्यक्ष खासदार मनोज कोटक, भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णा धुमाळ, आमदार महेश लांडगे, सामाजिक कार्यकर्ते मदन दिवाण यांचे निधी मिळण्यासाठी सहकार्य लाभल्याने त्यांचेही आभार मानले आहेत. संघाचे उपाध्यक्ष विजय पाटील, सचिव संजय भोसले, सहसचिव आबू भारणे, प्रवीण मोरे, खजिनदार राजेंद्र जाधव यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.













