न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आरोपी हा कार (एम एच ३१ / डी सी ५१०३) मधून प्रतिबंधित गुटखा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शेख याच्यावर कारवाई केली आहे. आरोपीकडून ६० हजार २०६ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि तीन लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी शेख याच्यावर भारतीय दंड विधान कलम १८८, २७२, २७३ तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्वर अली सुभेदार शेख (वय ५८, रा. सम्राट चौक, वाकड) असे अवैधरित्या गुटखा विकताना सापडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अनिल सदाशिवराव गवते यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विशेष म्हणजे आरोपी शेख याच्या मुलाने एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पोलिसांना अवैध धंदे बंद करण्याबाबत निवेदन दिले होते. पोलिसांनी कारवाई न केल्यास संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पोलिसांना देण्यात आला होता. आता त्याच सामाजिक कार्यकर्त्याच्या पित्यावर प्रतिबंधित गुटखा विकताना पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे हा शहरात चर्चेचा विषय झाला आहे.












