मदत छोटीशी करा मात्र, स्वतःच्या खिशातून करा – माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ एप्रिल २०२०) :- राज्यात व पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने धुमाकुळा घातला आहे. कोरोना युद्धासाठी उद्योजक, सिने अभिनेते, जाणकार नागरिक व काही स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेत, मोठे आर्थिक सहाय्य पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे. मात्र राज्यातील खासदार, आमदार हे मतदारसंघाच्या निधीतून ठराविक रक्कम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा म्हणून स्थानिक संस्था व आरोग्य विभागांना देत आहेत.
विशेषत: लोकप्रतिनिधींना शासनाने हा निधी जनतेच्या विकासकामांसाठी दिलेला असतानाही तो निधी स्वतःच्या खिशातून दिल्याचे हे लोकप्रतिनिधी जनतेला भासवीत आहेत. याचा पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी भांडाफोड केला आहे. लोकप्रतिनिधींनी आधी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेला द्यावा. मग कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेच्या नाहीतर स्वतःच्या खिशातून शासनाला मदत करावी, असे खडे बोल त्यांनी या खासदार व आमदारांना सुनावले आहेत.
तापकीर म्हणाले की, महाराष्ट्रातील काही खासदार व आमदार हे कोरोनासाठी निधी देताना स्वत:च्या खिशातून दिल्याचे भासवून जनतेची फसवणूक करीत आहेत. मुळात तुम्ही जनतेचे पैसे नाही तर स्वता:चे किती पैसे खर्च केले ते सांगा. तसे नसेल तर, तुम्ही जनतेची दिशाभूल करत आहात. मतदारसंघात किती कामे केली ते आधी जनतेला सांगा. शासनाने हा निधी जनतेच्या विकासकामांसाठी दिलेला असतानाही तो निधी कोरोनासाठी स्वतःच्या खिशातून दिल्याचे तुम्ही जनतेला भासवीत आहात, अशी कृती निश्चितच तुम्हाला भूषणाह नाही. मदत करायची असेल तर छोटीही चालेल मात्र, ती तुमच्या खिशातून करा, असा सल्लाही तापकीर यांनी या लोकप्रतिनिधींना दिला आहे.













