न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ एप्रिल २०२०) :- करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास करोनाच्यादृष्टीने संशयित आहे त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी त्ताकाळ संपर्क साधावा. करोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढं यावं. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावं, संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरीत कळवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
राज्यात करोना रुग्णांची संख्या दररोज शेकडोंनी वाढत आहे. मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तरीही परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैवं आहे. पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितले असतानाही, मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणं, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. यापुढे तरी सर्वांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे, असं पवार म्हणाले.
राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी अशा कोरोनाविरुद्धच्या यंत्रणेतील घटकांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसू लागला आहे. हे चिंताजनक आहे. हा प्रसार थांबवायचा असेल तर कोरोनाची साखळी तोडणं आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी घरात थांबणं, संशयित व्यक्तींनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होणं हाच प्रभावी मार्ग असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.













