- माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा शहर भाजपच्या नगरसेवकांना सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ एप्रिल २०२०) :- भाजप नगरसेवकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देण्याऐवजी पंतप्रधान मदत निधीला एक महिन्याचे वेतन देत खुशमस्करीचे दर्शन घडविले. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून कोरोना घटनेबाबत दुर्देवी राजकारण सुरु आहे, असा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे. या वादात आता माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मच्छिंद्र तापकीर यांनीदेखील उडी घेतली आहे. आज जशी मदत पंतप्रधान म्हणजेच दिल्लीश्वरांना केली, तशीच उद्या निवडणुकीत मतं मागायलासुद्धा दिल्लीश्वरांकडेच जावे, असा सूर त्यांनी आळवला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तापकीर यांनी म्हटले आहे की, ‘एका बाजूला पिंपरी चिंचवड शहरात राहून, प्रथम शहराचा, राज्याचा विचार न करणारे भाजपचे नगरसेवक पंतप्रधान मदतनिधीला एक महिन्याचे वेतन मदत म्हणून देतात. तर दुसरीकडे हेच नगरसेवक व त्यांचे पदाधिकारी राज्य शासनाने शहरातील गरिबांना मदत करावी, अशी दुट्टपी भूमिका घेतात. हे कोणत्या तत्वात बसते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्र शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी करतात. मात्र, केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. आज राज्य सरकारला सर्वाधिक मदतीची गरज आहे. केंद्र सरकारकडून सर्वाधिक मदतीची अपेक्षा आहे. असे असताना पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजपचे नगरसेवक स्वतःला कधीपासून दानशूर समजायला लागले. त्यांची एवढी दानत वाया जात असेल तर, त्यांनी शहरातील पाणीप्रश्न, अनधिकृत बांधकाम, रेडझोन, नदी सुधार प्रकल्प यावर खर्च करावा. आजतागायत या प्रश्नी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करूनही केंद्राने केवळ पाठ दाखविण्याचा उद्योग केला. स्थानिक स्वराज्य संस्थेचा नगरसेवक हा राज्य सरकारला बांधील असतो. मात्र भाजपचे नगरसेवक थेट पंतप्रधान सहायता निधीला मदत करतात. उद्या शहराचे एखादे काम अडले तर, हे भाजपचे नगरसेवक हे काम घेऊन राज्य सरकारऐवजी दिल्लीला जाणार आहेत का? म्हणजे काय तर पक्षीय अजेंडा जोपासण्यासाठी उद्या मानवतेचा बळी द्यायलाही हा पक्ष मागेपुढे पाहणार नाही, असेही तापकीर म्हणाले.
सध्या शहरात व राज्यात करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अक्षरशः आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. राज्य सरकारने आर्थिक मदतीचे आवाहन केले, तेव्हा शहरातील सर्वप्रथम दानशूर व्यक्ती, देवस्थानं, संस्था, विविध राजकीय पक्ष, विविध आस्थापनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ हाताने जमेल तशी मदत केली. मात्र, कोरोनाच्या संकटाशी सध्या सुरू असलेल्या या लढ्यात माणुसकीची अपेक्षा भाजपा नगरसेवकांकडून असताना, त्यांनी यातही राजकारण केले, असेही तापकीर म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येत्या दीड वर्षांवर येऊन ठेपलेल्या आहेत. जनतेचा कळवळा असणारे हेच भाजपचे नगरसेवक उद्या मतं मागायला शहरातील मतदारांकडे परत येणार आहेत. परंतु, आता त्यांनी जशी मदत पंतप्रधान म्हणजेच दिल्लीश्वरांना केली, तशीच उद्या निवडणुकीत मतं मागायलासुद्धा दिल्लीश्वरांकडेच जावे. शहरातील मतदारांकडे फिरकू नये. या घटनेमुळे भाजपचा पारदर्शक व ढोंगी चेहरा समाजासमोर उघडा पडलेला आहे. जनतेच्या दरबारात ‘देर आहे परंतु, अंधेर नाही’. याचा जबाब उद्या शहरातील जनता भाजपला नक्कीच विचारणार, असे या पत्रकात तापकीर यांनी म्हटले आहे.













