- खासगी दराने होतोय रुग्णांवर उपचार; मजीद शेख यांची चौकशीची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल २०२०) :- डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्यात नुकत्याच झालेल्या सामंजस्य करारानुसार यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे केवळ कोरोना बाधित रुग्णांवर पूर्ण क्षमतेने उपचार करणार असून, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय नॉन कोविड रुग्णांवर उपचार करणार आहे. मात्र, या दोन्ही रुग्णालयांकडून उपचाराच्या नावाखाली रुग्णांची हेळसांड आणि आर्थिक लुट केली जात आहे, असा आरोप जन अधिकार संघटनेचे अध्यक्ष मजीद शेख यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, डी. वाय. पाटील हे रुग्णालय वाय. सी. एम. रुग्णालयाकडून उपचारासाठी पाठविलेल्या रुग्णांची व त्या संबंधित नातेवाईकांची लूट करून, गैरसोय करीत आहे. वायसीएम रुग्णालय व्यवस्थापनाकडून आधीच्या समाविष्ट रुग्णांवर उपचार न करता, त्यांना डी वाय पाटील रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. रुग्णाच्या आजारपणाबाबतची तसेच केलेल्या उपचारांचा दस्ताऐवज (पेशंट हिस्ट्री) न देता असाच तोंडी डिस्चार्ज देऊन, त्यांना डीवाय पाटील रुग्णालयात भर्ती केले जात आहे. वायसीएममधून डीवाय पाटील रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गरोदर स्रियांच्या नातेवाईकांकडून पुढील उपचारासाठी दहा हजाराच्या जवळपास रक्कम मागितली जात आहे. तर अपघातग्रस्त रुग्णांना रुग्णालयात भर्ती न करता अन्य रुग्णालयात जाण्यास सांगितले जात आहे. इतर आजार असणाऱ्या रुग्णांची देखील तीच बोंब आहे.
मुळात वायसीएम हे शासकीय रुग्णालय आहे. करारानुसार शासनाच्या दरातच डी वाय पाटील रुग्णालयात रुग्णांवर उपचार व्हावयास हवेत. मात्र येथे तर खासगी दराने जनतेच्या खिशावर डल्ला मारला जात आहे. खासगी रुग्णालयात जायचे असेल तर, डीवाय पाटीलच का? शहरात इतर खासगी रुग्णालय आहेत, आम्ही त्या ठिकाणी जावू, असा प्रश्न नागरिक विचारू लागलेत. त्यामुळे आयुक्तांनी कष्टकरी, गोरगरीब, शोषित, वंचित, निराधार वर्गातील जनतेची लूट थांबवण्यासाठी डीवाय सोबतच्या कराराची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी, यासाठी समिती गठीत करावी व जनतेला न्याय द्यावा, असे या निवेदनात शेख यांनी म्हटले आहे.












