न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणूमुळे प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत हातावर पोट असणा-यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील काही स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तीदेखील पुढे सरसावल्या आहेत. लाॅकडाऊन मुळे शहरातील सर्व क्षेत्रातील बांधकाम प्रकल्प व इतरही कामे बंद असल्याने हातावर पोट असणारे हे असंघटीत क्षेत्रातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व सहकारी व संस्था मदत करीत आहेत पण काही असंघटीत क्षेत्रातील कामगार बांधव या मदतीविना दुर्लक्षित राहिले आहेत.
समाजातील विशेष घटक म्हणून आज कामगार बांधवाकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्र मजदूर संघटना ही नेहमीच कामगारांच्या करीता कार्यरत असते म्हणूनच मात्र नेहमीच या असंघटीत बांधवांच्या हिताचा विचार करीत त्यांच्यासाठी झटत असते. कोरोनामुळे कामगार बांधवांच्या परिस्थितीची जाणीव असणाऱ्या व यांच्या न्याय हक्कासाठी सदैव कार्यरत असायच्या नात्याने निगडी व चिंचवड परिसरातील मोहननगर परिसरातील कामगार बांधवांसाठी पीठ, तांदुळ, डाळ, तेल, मीठ, मिरची, मसाले, व आदी जीवनावश्यक साहित्याचे प्रती पाच, दोन, एक किलोप्रमाणे एक-एक किट तयार करून त्या कीटचे वाटप केले. त्यामुळे अंध बांधवांना दिलासा मिळाला आहे. निगडी व मोहननगर परिसरातील जवळपास २०० कामगार बांधवाना या जीवनावश्यक किटचे वाटप केले.
यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद, सल्लागार बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष परेश मोरे, जन. सेक्रेटरी प्रवीण जाधव, राहुल कोल्हटकर, प्रितेश शिंदे, अरूण जोगदंड, अप्पा मुजमले, खंडू गवळी, आप्पा कौदरी, पांडुरंग कदम, सतिश कंटाळे, गोरक्ष दुबाले, राजु तापकीर, सुनिल साळवे, संजय बांदल, प्रभाकर गुरव, बाबासाहेब पोते, तेजस भंडारी, अहिमद शेख, रवि वंजारी आदींनी परिश्रम घेतले.
इरफान सय्यद यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात देखील याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शहरातील कामगार, कष्टकरी व बांधवांवर यामुळे आभाळ कोसळले आहे. पिंपरी-चिंचवडमधील महाराष्ट्र मजदूर संघटना या संपूर्ण परिस्थितीशी लढण्याकरिता आणि नागरिकांच्या मदतीकरिता सज्ज आहे. कामगार व कष्टकरी यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. मात्र समाजातील विशेष घटक या मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी कामगार बांधवाना या वस्तूंचे किट देण्यात आले. याचाच एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या काळात कामगार बांधवाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनीदेखील अशा कामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील सय्यद यांनी यावेळी केले.













