न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी एक करोना बाधित रुग्ण आढळला आहे. या रुग्णाचे पिंपरी-चिंचवड शहरात चिकनचे दुकान आहे. ही व्यक्ती आपलं दुकान सुरु ठेवण्यासाठी परवानगी घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस ठाण्यात गेली होती. दोन दिवसांत त्यानं दोन ते तीन वेळेस या पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर बुधवारी रात्री तो करोनाबाधित असल्याचं निष्पन्न झालं.
त्यानंतर संबंधित पोलीस ठाणे निर्जंतुक करण्यात आले असून, योग्य ती काळजी घेतली जात आहे. मात्र, त्यावेळी करोनाबाधित असल्याचे संबंधित व्यक्तीलाही माहिती नसल्याने, नकळत तो पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
हा कोरोनाबाधित रुग्ण त्या पोलीस चौकीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेला आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला असून, पोलीस प्रशासन त्या चौकीतील पोलिसांना क्वारंटाईन करून, त्यांची कोरोना चाचणी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.













