- पुण्यात आज दोन महिलांचा मृत्यू…
- कोरोनाग्रस्त दाम्पत्याला विलगीकरण कक्षात न ठेवता पाठवले घरी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२०) :- करोनाबाधित रुग्णांचे निधन झाल्यास संबंधित रुग्णांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार नाहीत. त्या मृतदेहांवर गॅस किंवा विद्युत दाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
करोनाबाधित मृतदेह दफन करायचे असल्यास शहरापासून दूर अंतरावर सहा फूट खोल खड्डा खणून आणि त्यामध्ये र्निजतुक लिक्विड टाकून मृतदेह प्लास्टिकच्या दोन बॅगांमध्ये दफन केले जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुण्यात आज दोन महिलांचा मृत्यू
पुण्यातील संगमवाडी परिसरातील एका ५८ वर्षीय महिलेसह सोमवार पेठेतील एका ५६ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिलांना अन्य आजारांनी देखील ग्रासले होते असे देखील सांगण्यात आले आहे. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्यात आतापर्यंत करोनामुळे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या ३१ रुग्णांपैकी आज २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात आज १३४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या १८५९ वर पोहचली आहे.
तपासणी न करताच सोडले दाम्पत्याला घरी
शहरातील ससून रुग्णालयात एका वृद्ध महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. या वृद्ध महिलेच्या संपर्कात तिचा मुलगा आणि गर्भवती सून आली होती. रुग्णालयानं त्या दोघांचे चाचणीसाठी नमुने घेतले. मात्र, त्यांना विलगीकरण कक्षात न ठेवता संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देण्यात आलेल्या या दाम्पत्याला करोना असल्याचं नंतर आलेल्या रिपोर्टमधून समोर आलं. मात्र, त्याआधीच त्यांना सुटी दिल्यानं काहीशी चिंता वाढली आहे.















