- शहर राष्ट्रवादी कार्यकर्ता संदीप काटे यांचे पिंपळे सौदागरवासियांना आवाहन…
- पिंपळे सौदागर परिसरात काटे यांनी केली स्वखर्चाने औषध फवारणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२०) :- जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातलेले आहे. महाराष्ट्रात खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुंबई, पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरही रेड झोनमध्ये गेले आहे. पिंपरी चिंचवड शहरात ३५ करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तर हजारांपेक्षा अधिक नागरिक होम क्वारंटाईन आहेत. शहरात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच रविवारी एका करोनाग्रस्त पुरुषाचा मृत्यूदेखील झाला आहे. त्यामुळे नागरिक धास्तावलेले आहेत. अशा वेळी नागरिकांना धीर देत, ‘तुम्ही घराबाहेर पडू नका, स्वतःची काळजी घ्या; तुमची जबाबदारी आम्ही घेत आहोत, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी पिंपळे सौदागर वासियांना केले आहे.
काटे यांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत, नुकतीच पिंपळे सौदागरमधील जवळपास १५०० नागरिकांची वस्ती असणाऱ्या विश्वशांती कॉलनी परिसरात करोना विषाणूला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्वखर्चाने स्वच्छता मोहीम व सोडिअम हायपोक्लोराईट औषधाची फवारणी केली. यावेळी परिसरातील सुदाम काटे, आबा पांढरे, माउली काटे आदींनी परिश्रम घेतले. तसेच त्यांनी परिसरातील गरजू व हातावर पोट असणाऱ्या गोर-गरिबांना अन्नदान व आर्थिक मदत कुठलीही प्रसिद्धी न करता केलेली आहे.
संदीप काटे न्यूज पीसीएमसीशी बोलताना म्हणाले की, निवासी इमारती आणि बैठी घरं या ठिकाणी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणी करण्याचा नागरिकांकडून आग्रह करण्यात येत आहे. जेणेकरुन त्या परिसरामध्ये कोठेही विषाणू असल्यास तो नष्ट करण्यास मदत होईल. त्यामुळे पिंपळे सौदागरमधील जवळपास १५०० नागरिकांची वस्ती असणाऱ्या विश्वशांती कॉलनी परिसरात ही औषध फवारणी करण्यात आली. उर्वरित परिसरात देखील विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरचेवर, तसेच आवश्यकता भासल्यास पुन्हा या परिसरात औषध फवारणीची मोहीम राबविण्यात येईल.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या आधी देखील मी महापालिकेकडे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत, महापालिकेने पिंपरीतील वायसीएम रुग्णालय हे केवळ करोनाग्रस्त रुग्णांसाठी राखीव ठेवले आहे.
नागरिकांनीदेखील शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत, घराबाहेर पडू नये, अगदीच आवश्यकता असेल तर मास्क लावल्याशिवाय बाहेर जाऊ नये, सोशल डिस्टन्सिंग पाळा, भाजीपाला, किराणा घेण्यासाठी गर्दी करु नका, या प्रकारचं आवाहन करीत, ही लढाई आपण जिंकणारच, असाही विश्वास काटे यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना व्यक्त केला.















