न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२०) :- करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुण्यात मंगळवारी ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी चार जणांना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं पुण्यातील वातावरण चिंताजनक बनलं आहे. महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आढळून आलेल्या या शहरात आता करोनामुळे मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. शहरातील ससून रुग्णालयात करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जात असून, विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या आणखी चार जणांचा मंगळवारी मृत्यू झाला.
काळजी करण्यासारखी बाब म्हणजे मृतांमध्ये घोरपडी गावातील ७७ वर्षीय, तर कोंढव्यातील ४२ आणि ५० वर्षीय महिलेसह एका २७ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. महिलांना इतरही आजार होते, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा ३८ वर पोहोचला आहे.


















