- पिंपरीत भाजी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; तर पोलिसांचा लाठीमार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने गेल्या तीन दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भाजी मंडई बंद करण्याचे आदेश दिले. बंदीची ही मुदत बुधवारी संपुष्टात येत असल्याने महापालिका आयुक्तांनी एक परिपत्रक काढून बुधवारपासून सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत मंडई सुरू राहणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा एकदा परिपत्रक काढून बुधवारी भाजी मंडई बंद राहणार असून या भाजी मंडई मोकळ्या जागेत स्थलांतरीत केल्या जातील, असे जाहीर केले. तसेच भाजी आणि फळ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांबाबत पुढील काळात निर्णय घेतला जाईल, असेही या नवीन आदेशात म्हटले. मात्र या नवीन आदेशाची माहिती नागरिकांपर्यंत पोचलीच नाही.
बुधवारी पहाटेपासून नागरिकांनी भाजी घेण्यासाठी गर्दी केली. त्यावेळी मंडईत अवघे दोनच पोलीस कर्मचारी होते. मात्र त्यांनीही याबाबत वरिष्ठांना कळविले नाही. दरम्यान माहिती झाल्यानंतर पोलीसांची कुमुक वाढवून पिंपरी भाजी मंडईतील गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दी जादा प्रमाणात असल्याने अखेर राज्य राखीव दलाच्या जवानांनाही मंडई परिसरात जाऊन गर्दी कमी करण्याचे आदेश दिले. राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी सौम्य लाठीमार केल्याने काही वेळेतच जमाव पांगला. आता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोस्त ठेवण्यात आला आहे.












