- रात्री नऊ ते बारापर्यंतच शेतीमालाची आवक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२०) :- टाळेबंदीत नागरिकांना अन्नधान्य, भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंची झळ पोहोचू नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने उपाययोजना सुरू केली आहे. मोशी येथील भाजीपाल्यांच्या उपबाजाराचे कामकाज रात्रीपासून सुरू झाले. लवकरच मांजरी, उत्तमनगर येथील भाजीपाल्यांचे उपबाजार सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पोलिसांच्या असहकार्यामुळे भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर बुधवारपासून (१५ एप्रिल) भुसार बाजार सुरू झाला. त्यानंतर मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजाराचे कामकाज बुधवारी रात्रीपासून सुरू करण्यात आले, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत शेतीमालाची आवक मोशीतील उपबाजरात होईल. त्यानंतर शेतीमालाच्या गाडय़ांना मोशीतील उपबाजारात प्रवेश दिला जाणार नाही. आवक झालेल्या शेतीमालाची विक्री पहाटे दोन ते पाच वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोशीतील उपबाजारात किरकोळ खरेदीदारांना प्रवेश देण्यात येणार नाही. आडत्यांनी फक्त घाऊक खरेदीदारांना भाजीपाल्याची विक्री करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार आवारातील सर्व व्यवहार सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवून करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


















