- मनपा विरोधी पक्षनेते नाना काटे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२०) :- आपला जीव धोक्यात घालून करोनाशी लढा देणाऱ्या व शहरातील नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या आशा सेविकांना महापालिकेकडून प्रोत्साहनपर भत्ते, वेतन तसेच विम्याचे संरक्षण तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
आरोग्य अभियानांतर्गत आशा सेविका शहरातील बालमृत्यू रोखणे, गर्भवती मातांचा मृत्यूदर कमी करणे, विविध आजारांचे रुग्ण शोधणे व त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच रुग्णालयात पोहोचविण्याचे काम करत होत्या. मात्र, करोनाच्या महामारीमध्ये महापालिकेकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणाची जबाबदारी या आशा सेविकांवर सोपविण्यात आली आहे.
सेविकांना केंद्र व राज्य शासनाकडून मानधन दिले जाते. त्यांना ठराविक मानधन नसून, त्यांना दिले जाणारे मानधन त्यांच्या परफॉर्मन्सवर दिले जाते. या सेविकांना सध्या मानधन मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. सध्या या सेविका आपला जीव धोक्यात घालून सर्वेक्षणाचे काम करत असून, त्यांनाही अत्यावश्यक सेवेतील इतर कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा मिळणे आवश्यकआहे. या सेविकांना केंद्र शासनाच्या धर्तीवर ९० दिवसांसाठी तात्काळ ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे. तसेच कंत्राटी कामगार वा नियमातील शासकीय तरतुदीनुसार त्यांना या महिन्याचे वेतन तसेच प्रोत्साहनपर भत्ते देण्यात यावेत. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना उपलब्ध न करून दिलेल्या पीपीई किट, सॅनिटायझर, साबन व मास्क यासारखे साहित्यही तात्काळ या उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.


















