न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे. २०२०) :- सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे ६ हजार ९११ क्विंटल अन्नधान्याची तर २ हजार ९२२ क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात १ हजार ७३३ क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक ३ हजार १७१ क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
पुणे विभागात ३० एप्रिल २०२० रोजी १०२.०१ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून २३.४४ लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
तर, लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत १५८ कॅम्प, कामगार विभागामार्फत ६८ कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत २६० कॅम्प असे पुणे विभागात एकुण ४८६ रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये ४२ हजार ८३६ स्थलांतरित मजूर असून १ लाख १४ हजार ६३६ मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.


















