न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे. २०२०) :- कोरोनामुळे देशभरासह पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळावी, यासाठी मराठवाडा जनविकास संघ शहरातील वंचित कुटुंबाना मदत करीत आहे.
पिंपळे गुरवमधील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती तसेच पिंपरी चिंचवड-पुणे शहर मित्र परिवाराच्या वतीने रविवार (दि. १०) रोजी जागतिक मातृदिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर व भोसरीतील विविध भागामध्ये जवळपास तीनशेच्या वर गरजु कुटुंबाना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यात गहू, तांदूळ, तूरडाळ,पोहे, चहा-पावडर, तेल, साखर, मिरची पावडर या वस्तूंचा समावेश आहे. प्रत्येक कुटुंबाला दहा ते पंधरा दिवस पुरेल एवढी सामग्री देण्यात आली आहे.
मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये माणुसकीची भावना जपत, जागतिक मातृदिनाचे औचित्य साधत, पिंपरी चिंचवड शहर व भोसरीतील विविध भागामध्ये जवळपास तीनशेच्या वर गरजु कुटुंबाना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. या आधीही मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने शहरातील लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांसाठी दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करीत आहोत. शहरातील नागरिकांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी घरीच थांबावे. घरी बसून देशसेवा करण्याची सुवर्णसंधी प्रत्येकाला मिळाली आहे, त्याचा सर्वांनी पुरेपूर वापर करावा, असे आवाहन पवार यांनी केले आहे.













