न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२०) :- राज्यात विशेषतः ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या उद्देशाने शहरी अथवा इतर भागात रूम घेऊन भाडेतत्वावर राहत आहेत. परंतु कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण शैक्षणिक संस्था तथा शैक्षणिक कार्यक्रम बंद आहेत. परिणामी बहुतांश विद्यार्थी हे आपापल्या गावी परतलेले आहेत. तरी देखील काही रूम मालक भाडे वसुलीसाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकत आहे. याबाबत आप युवा आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन पाठविले आहे.
या निवेदनात त्यानी म्हटले आहे की, कोरोना संकटकाळात रोजच्या अन्न-पाण्याची भ्रांत पडलेली असताना शेतकरी – कामगार – मजदूर अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या कोरोनाकाळात हे भाडे देणे परवडणारे नाहीत. तशी वसुली करणे अन्यायकारक व विद्यार्थीविरोधी आहे. जे रूम मालक विद्यार्थ्यांवर ‘भाडे द्या अन्यथा सामान घेऊन जा’ अशी धमकी देऊन दबाव टाकत असेल तर त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करावी. तसेच विद्यार्थी आणि रूम मालक यांच्यात जो काही भाडे करार झाला असेल, त्यातुन “एप्रिल २०२०” या महिन्यापासून ते प्रत्यक्ष शैक्षणिक कार्यक्रम चालू होईपर्यंत अर्थात त्या रूमचा प्रत्यक्ष वापर होईपर्यंतच्या मधल्या कोरोनाकाळातील महिन्यांना वगळावे. विद्यार्थ्यांचे भाडे माफ करण्याच्या मुख्य हेतूसिद्धीसाठी रूम मालकांना सरकारने योग्य ते पॅकेज द्यावे अथवा योग्य ते पाऊल उचलावे.
दिल्लीमध्ये आप सरकारने ज्या घर मालकाने भाड्याची मागणी केली आहे, त्यांना सरकार तर्फे भाडे देण्यात आले आहे. तसंच महाराष्ट्रातसुद्धा केलं पाहिजे. जेणेकरून कोणाची गैरसोय होऊ नये. जर सरकार कामगार कायदे गुंडाळू शकते तर विद्यार्थ्यांना भाडेकरारात सूट का मिळू शकत नाही?. शासनाने विद्यार्थी हितासाठी त्वरीत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.















