- स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले असतानाच, चिंचवड स्टेशनमधील आनंदनगर झोपडपट्टीत देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. हा परिसर महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. आनंदनगर हा स्लम परिसर असल्यामुळे महापालिकेने या भागाकडे विशेष लक्ष पुरविणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी या भागाचे स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे यांनी पुढाकार घेतला आहे.
याबाबत बोलताना नगरसेवक मोरे म्हणाले की, चिंचवड स्टेशन येथील आनंदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ११ वर गेली आहे. यासाठी लोकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, मास्कशिवाय खरेदीसाठी बाहेर पडू नये, हात वेळेवर धुवावेत, एकमेकांपासून दूर रहावे, रस्त्यावर येऊ नये, अशा महत्वाच्या सुरक्षेच्या उपयोजनांची माहिती लोकांना देत आहे. त्यांच्या भेटी-गाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. तसेच अत्यावश्यक तथा जीवनावश्यक मदतीसाठीही मी तत्पर आहे.
शहरातील इतर प्रभागांपेक्षा आनंदनगर मधील परिसर विशेष आहे. लोकांनी कोरोनापासून दूर कसे रहावे, स्वतःची सुरक्षा कशी करावी? यासाठी परिसरात जनजागृती सुरु आहे. मात्र, या भागाकडे महापालिकेने अधिक लक्ष पुरविणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोनाचा मोठा भडका होऊ शकतो. महापालिकेकडे याबाबतीत पाठपुरावा सुरु आहे. आनंदनगरची धारावी होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. आनंदनगरमध्ये पोलीस तैनात करण्यात यावेत. गस्त वाढवावी, त्या भागात राहणाऱ्या पालिकेच्या सफाई कामगारांची ड्युटी तेथेच लावावी आदी मागण्या आयुक्तांकडे केल्या आहेत.















