न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना (कोविड १९) विषाणूंचा प्रादुर्भावामुळे इतर अनुषंगिक कामे तातडीने करणे संदर्भात आज गुरुवारी (दि. २०) रोजी आयुक्त दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष आण्णा लोंढे व आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील. डॉ. अनिल रॉय व उपसंचालक रा. म. पवार इ. उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करुन कामे करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये वास्तव्यास असलेले इतर राज्यातील नागरिक त्यांच्या राज्यामध्ये मोठया प्रमाणात पायी, ट्रकने, दुचाकी किंवा स्वत:च्या खाजगी वाहनाने स्थलांतरीत होत आहेत. यामुळे काही ठिकाणी वाहनांचा अपघात होत असून त्यामुळे जिवीतहानीच्या घटना देखिल घडल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी व इतर राज्यातील लोकांना त्यांच्या मूळ गावी सुखरुप जाण्याकरीता पिंपरी चिंचवड शहरातून रेल्वे उपलब्ध करुन द्यावी. त्यासाठी महापालिकेकडून महापौर निधीची जास्तीत जास्त तरतूद करणेत यावी. तसेच त्यांचे रेल्वेने जाण्याचे भाडे सध्या केंद्र शासन ८०% भरणार आहे. तथापि यातील बहुतांशी इतर राज्यातील नागरिक हे मोलमजुरी करणारे असल्याने त्यांना आर्थिक बोजा सहन होणार नाही त्यामुळे त्यांचे उर्वरित २० % रेल्वे भाडे रक्कमेचा खर्च पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर निधीतून करणेत यावा.
कोरोना (कोविड १९) विषाणूंचा प्रादुर्भाव पार्श्वभुमिवरील लॉकडाऊनच्या कालावधीत पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच उद्योगधंदे बंद असल्याने लघुउद्योजकांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. त्यामुळे या नुकसानीतून बाहेर येण्यासाठी त्यांना बराच कालावधी लागणार आहे. सबब हि बाब विचारात घेऊन पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील सर्व लघुउद्योगांचा व बिगनिवासी (कमर्शियल) मिळकतींवर आकारणेत येणारा तीन महिन्याचा मिळकत कर माफ करणेत यावा.
आनंदनगर, भाटनगर या सारख्या झोपडपट्टी भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. यामुळे आपल्या येथे धारावी सारखी परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी वेळीच तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. यासाठी वेळ पडल्यास इस्टीटयूशनल कॉरंटाईनसाठी मनपा शाळा इमारतींचा वापर करुन कोरोनाचा प्रादुर्भाक कमी करणेत यावा.
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर भारत सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आत्मनिर्भर भारत च्या माध्यमातून स्वदेशी वस्तू वापराबाबत मनपा स्तरावर ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या तातडीने आमलात आणाव्यात.
कासारवाडी येथील हॉटेल कलासागरच्या लगतच्या नाल्यामुळे पवना नदी तसेच चिखली येथील नाल्यामुळे इंद्रायणी नदी या दोन्ही नदया अत्यंत प्रदुषित होत आहेत त्यामुळे या दोन्ही ठिकाणी तातडीने ईटीपी प्लॅन्ट (ETP) उभारणेची कार्यवाही करणेत यावी.
पवना बंद जलवाहिनी प्रकल्प संदर्भात सोमाटने येथे झालेल्या आंदोलनात सुमारे १३ ते १४ शेतकरी जखमी झाले होते तसेच त्यांचेवर गुन्हेही दाखल झाले होते. या सर्व जखमी शेतक-यांना अथवा त्यांचे कुटुंबातील एका व्यक्तीस महानगरपालिकेमध्ये नोकरी देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणेत यावी., अशा आदी विषयांवर सखोल चर्चा झाली.















