न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने आनंदनगरमधील नागरिकांना निगडीतील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहे. काल १४ नागरिकांना तिथे क्वारंटाईन केले आहे. ५०० नागरिकांना तिथे क्वारंटाईन करण्याचे नियोजन आहे. परंतु, आनंदनगरमधील नागरिकांना त्याच परिसरातच क्वारंटाईन करावे. आमच्या ग्रीनझोन मध्ये तेथील नागरिकांना क्वारंटाईन करु नये.
प्रभागातील नागरिकांना त्याचा धोक निर्माण होईल, अशी भिती निगडी प्राधिकरण येथील नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध करत नगरसेवकांनी चक्क रात्र रस्त्यावर काढली. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या चिंचवड आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांना निगडीतील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यास स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी विरोध केला आहे.
आजपर्यंत निगडी प्राधिकरणातील नागरिकांनी दक्षता घेत हा प्रभाग कोरोनामुक्त ठेवला आहे. प्रभाग ग्रीनझोन आहे. त्यामुळे या ठिकाणी हॉटस्पॉट मधील नागरिकांना ठेवणे अतिशय चुकीचे असल्याचे सांगत नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ यांनी क्वारंटाईन सेंटरला विरोध केला आहे.


















