न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- महाराष्ट्रात व पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे दिवसेंदिवस प्रमाण वाढू लागले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अपयशी झाल्याच्या निषेधार्थ भाजपने “मेरा अंगण, मेरा रणांगण” आंदोलन केले. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात बालगोपाळांचे आंदोलन सोशल मीडियात ट्रोल झाले व आंदोलन फसले. या नैराश्यातूनच बालिश बुद्धीने भाजपच्या एका माजी सरचिटणीसाने पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पालकमंत्र्यांची मागणी केली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कलाटे यांनी म्हटले आहे की, कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस भाजपला सापडणार नाही. राज्यातील आंदोलन व राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे भाजपचे प्रयत्न फसले. महाराष्ट्रातील लोकांचा रोष माथी बसेल म्हणून पत्रकार परिषदेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राने महाराष्ट्राला दिलेले अनुदान भाजपने दिल्यासारखे आकड्यांची लिस्ट शाळेत बसल्यासारखी माध्यमांना वाचून दाखवली. तोच बालिशपणा भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी एका थकलेल्या कार्यकर्त्याच्या गळ्यात पट्टा अडकवून शहराला स्वतंत्र पालकमंत्रीची मागणी करून दाखवला आहे, असेही कलाटे यांनी म्हटले आहे. .
पुणे, पिंपरी चिंचवड हे अजित पवार यांचे माहेरघर आहे. पुणे शहरात व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे रुग्ण दैनंदिन वाढत आहेत. अशावेळी अजितदादा पुणे शहरात सर्वाधिक मीटिंग घेत प्रशासनाला सूचना देताना दिसतात. शनिवारी त्यांनी पुण्यात कोरोना नियंत्रणासंदर्भात पुणे व पिंपरी चिंचवड येथील लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले तरी, अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्यानं काम करावं, अशा सूचना अजितदादांनी दिल्या आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे सांगितले. या बैठकीला शहरातील भाजपचे लोकप्रतिनिधी काहीही बोलत नाहीत, काही मागणी ही करत नाहीत.
कोरोनामुळे घोषित केलेल्या लॉकडाऊनला ६० दिवस म्हणजे तब्बल दोन महिने पूर्ण झाले. या कालावधीत पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवडला धावती भेट दिली नाही. अजित दादा कुठे आहेत असे विरोधकांकडून विचारणा केली जात आहे. त्यांनी शहराला भेट दिली नसली तरी शहराच्या प्रश्नावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी पुण्यामध्ये वारंवार चर्चा करतात, वेळप्रसंगी फोनवरून सूचनाही देतात. मात्र, भाजप महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोरोना परिस्थितीमध्ये ही पदवीधर मतदार नोंदणी करण्यात प्राधान्य देताना दिसून आले. अजितदादांचे पिंपरी-चिंचवडमधील हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यापासून ते दोन महिने ठप्प झालेली उद्योगनगरी पूर्ववत सुरू करून महत्त्वपूर्ण काम केले आहे, असेही कलाटे यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन महिन्यांचा सर्व घटनाक्रम तपासला तर पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याशी नेहमी समन्वय ठेवून पिंपरी-चिंचवडकरांना कोणतीही कमतरता जाणवू नये याची काळजी घेतली. तर सत्ताधारी भाजपचे दोन्ही आमदार मतदारसंघ सोडून फक्त महापालिकेतील चौथ्या मजल्यावर बसून अर्थकारण करताना दिसतात. कोरोना संकट काळात भाजपचे नेत्यांकडून मेलेल्या मढयाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार महापालिकेत चालू आहे हा सर्व प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस उजेडात आणणार आहे. अजितदादांचे पिंपरी-चिंचवडकराशी राजकीय नव्हे तर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू होईल तेव्हा भाजपच्या नेते सैरभैर होतील आणि बारामतीची भानामती काय आहे हेही त्यांना लवकर समजेल, असे या पत्रकात कलाटे यांनी म्हटले आहे.











