न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे. २०२०) :- मावळातील देहरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील चिंचोली येथील एका मधुमेही वयोवृद्ध रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने देहूरोड पोलीस ठाणे हद्दीत करोना रुग्णाची संख्या आता नऊ झाली आहे.
देहरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत दोन रुग्ण आढळल्याने परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्रातून वगळण्यात आला होता. तसेच कॅन्टोन्मेंट प्रशासनाने काही अटी – शर्थीवर दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती. परंतु चिंचोलीत एका वयोवृद्ध व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंचोलीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या कुंटुबातील १७ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात तर शेजारील ४० जणांना विलगीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात सेवेत असणाऱ्या देहूरोडमधील विकासनगर येथील एक पोलिस कर्मचारी कोरोना संक्रमित आढळला होता. त्याच्या कुटुंबातील आणखी तिघांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले. घरी परतलेल्या या कुटुंबावर नागरिकांनी फुलांची उधळण करून स्वागत केले. विकासनगर येथील पोलीस कुटुंबाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
लोणावळ्यात खंडाळा येथील एका ७४ वर्षीय व्यक्तीला बुधवारी (दि. २७) कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. लोणावळ्यात हा पहिलाच रुग्ण असून शहरात संसर्ग वाढू नये यासाठी लोणावळा नगरपालिका व पोलीस प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागले आहे. संबंधित व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग कसा आणि कोणाकडून झाला याबाबत नगरपरिषदेने शोध सुरू केला आहे.