न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे. २०२०) :- नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा उघड झाल्यानंतर सहायक आरोग्य अधिकाऱ्यासह पाच जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधितांनी याबाबतचा खुलासा नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत सादर करावा. खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेतर्फे सध्या नाले सफाईची कामे सुरू आहेत. नालेसफाई करताना महापालिकेतर्फे सफाई कर्मचाऱ्यांना मास्क, हातमोजे, गमबूट, साबण आदी सुरक्षा साधने नियमितपणे दिले जात नाहीत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आरोग्य कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अॅड. सागर चरण यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती.
या पार्श्वभूमीवर डॉ. रॉय यांनी याबाबत प्रभारी सहायक आरोग्याधिकारी अजय जाधव, आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे, बी. आर. राठोड, मुकादम नलिनी नागपुरे, आशा जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.