न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे. २०२०) :- सध्या मोबाइल कंपनीकडून बोलत असल्याची बतावणी तसेच मोबाइल संभाषण, अन्य त्रुटी दूर करण्यासाठी सीमकार्ड अद्ययावत करण्याचे आमिष दाखवून नागरिकांच्या बँक खात्यातील पैसे लांबविण्याचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर मोबाइल ग्राहकांनी अज्ञाताने संपर्क साधल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली जाते. संभाषणातील त्रुटी (कॉल ड्रॉप), इंटरनेटचा वेग आदी त्रुटी दूर केल्या जातील. त्यासाठी फक्त सीमकार्ड अद्ययावत करावे लागेल, असे चोरटय़ांकडून सांगितले जाते. त्यानंतर चोरटा मोबाइल क्रमांकावर एक २० अंकी सीमकार्ड क्रमांक असलेला संदेश पाठवितो.
हा संदेश पुन्हा १२३५४ या क्रमांकावर पाठविण्यास सांगितले जाते. संदेश पाठविल्यानंतर लगेचच सीमकार्ड बंद पडते. ज्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर चोरटय़ाकडून संपर्क साधण्यात आला असेल तो क्रमांक आपोआप चोरटय़ाकडील सीमकार्डवर सुरू होतो. त्यानंतर बँकेकडून येणाऱ्या संदेशाचा गैरवापर करून चोरटा बँक खात्यातून पैसे काढून घेतो. सायबर पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या तक्रारी गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत.