न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून. २०२०) :- पिंपरीतील वायसीएममधील ३३ डॉक्टरांना ऑगस्ट २०१८ पासून २४ हजार ८०० रुपये तुटपुंजे विद्यावेतन मिळत होते. या अनुषंगाने कोरोना विरोधात लढणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील सीपीएस निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात २५ हजारांनी वाढ करण्यात आली आहे.
या डॉक्टरांना यापुढे ५० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला. या डॉक्टरांना माहे एप्रिलपासून ५० हजार ११२ रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.
विद्यावेतन कमी मिळत असल्याने शहरात राहणे कठीण बनले आहे. मुंबई महापालिकेने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सीपीएस निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ केली आहे. आम्ही एमबीबीएस पदवी प्राप्त असून, इतर निवासी डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी यांच्यासारखेच आणि त्यांच्या इतकेच काम करत आहोत, तरीही विद्यावेतनात फार मोठी तफावत आहे, असे या डॉक्टरांचे म्हणणे होते. या मागणीसाठी डॉक्टरांनी रुग्णालयासमोरच आंदोलन केले होते.


















