न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती सुधारावी आणि ते लवकर बरे व्हावे यासाठी त्यांचे काही समर्थक उपवास करत आहेत, काहीजण नवस-पायी वाऱ्या करत आहेत, तर कोणी मुंबईकडे येण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अशा समर्थकांना धनंजय मुंडे यांनी, “मित्रांनो, मी बरा आहे काळजी करू नका. कोणी कसलाही त्रास करून घेऊ नका. तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचते आहे. त्यामुळे अन्नत्याग, पायपीट, नवस असे स्वतःला इजा करणारे कृत्य करू नका ही कळकळीची विनंती. तुम्हाला होणारा त्रास हा मला वेदना देणारा आहे”, असे आवाहन सोशल मीडियाद्वारे केले आहे.
दरम्यान, मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली. धनंजय मुंडे हे करोनाची बाधा होणारे राज्य सरकारमधील तिसरे मंत्री ठरले आहेत. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. यामध्ये त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी आणि बीडच्या वाहन चालकाचा समावेश आहे.