न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- देहूरोड रेल्वे स्टेशन जवळील पुलावर बेवारस मृतदेह आढळला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. कपड्यांच्या टेलर टॅगवरून भिवंडी येथील टेलरकडे पोलिसांनी चौकशी केली. दत्तात्रय कृष्णाजी माचा (वय ४१, रा. शांतीनगर, भिवंडी, मूळ रा. इंद्रा वसाहत, भवानी पेठ, घोडगेवस्ती, सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. लॉकडाऊनमुळे ते सोलापूर येथे अडकले होते. पैसे संपल्याने ते सोलापूर येथून मुंबईकडे पायी निघाले होते.
दरम्यान पिंपरी – चिंचवड शहरातील निगडी येथे भक्ती शक्ती चौकात तीन अल्पवयीन मुले व त्यांची भेट झाली. ते बोलत पायी जात असताना एका अल्पवयीन मुलाने माचा यांच्याकडे पैसे मागितले. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे अल्पवयीन मुलांना राग आला. देहूरोड येथे पुलावर पदपथावर माचा झोपले असताना अल्पवयीन मुलानी त्यांच्या डोक्यात दगड घातला. यात माचा यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलांनी माचा यांच्याकडील पैसे व मोबाइल घेऊन तेथून पळ काढला.
पोलिसांनी तांत्रिक विशेषणावरून आरोपींचा शोध घेतला. त्यासाठी गुन्हे शाखा युनिट पाचच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आठवडाभर पुणे , मुबई , सोलापूर, कर्नाटक , आंध्रप्रदेश व तेलंगणा असा अडीच हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. नंतर तपासाची चक्रे वेगात फिरून तीन अल्पवयीन मुलांना पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले.















