न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२०) :- ग्राहक मंचात होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्राहक मंचाकडून ‘कन्झ्युमर कनेक्ट’ आणि ‘गो टू मिटींग’ हे अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून तक्रारदार ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे ग्राहक मंचात दाखल करता येणे शक्य होईल. यामुळे ग्राहकांना घरबसल्या न्याय मिळणे शक्य झाले आहे. ग्राहक तक्रार निवारण मंचात दाखल झालेल्या प्रकरणांना पुढील तारखा देण्यात येत होत्या.
मुंबईपुरता मर्यादित असलेला हा उपक्रम आता राज्यातील अन्य ग्राहक मंचात देखील राबविण्यात येणार आहे. कन्झ्युमर कनेक्ट अॅपद्वारे ग्राहकांना तक्रारींची स्कॅन कागदपत्रे घरी बसून अपलोड करता येणार आहेत. सुनावणी घ्यायची झाल्यास वकील आणि पक्षकारांकडून मंचाला तारीख कळविण्यात येईल. त्यानंतर ग्राहक तक्रार निवारण मंच ठरावीक तारखेला उपलब्ध होईल. प्रत्यक्ष सुनावणीसाठी वकील, पक्षकार आणि बचाव पक्षाला हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.
प्ले स्टोअरवर कन्झ्युमर कनेक्ट, गो टू मिटींग हे दोन्ही अॅप नि:शुल्क उपलब्ध आहेत. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्वप्रथम ग्राहकांना स्वत:ची माहिती भरावी लागेल. कागदपत्रे स्कॅन करून ती जमा करावी लागतील. गो टू मिटींग अॅपद्वारे तक्रारदाराला सुनावणीसाठी हजर राहता येईल. त्यासाठी तक्रारदाराला न्यायमंचाकडून लिंक पाठविण्यात येईल. लिंक कार्यान्वित केल्यास गो टू मिटींग अॅपद्वारे तक्रारदार ग्राहक, वकील आणि प्रतिवादी सुनावणीसाठी हजर होतील.