न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२०) :- पिंपळे सौदागर येथील विराज जगताप खून प्रकरणात एका तरुणीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी मुलीची बदनामी न करण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरी देखील बदनामीकारक पोस्ट टाकणाऱ्यावर मंगळवारी (दि. १६) वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विराज जगताप या तरुणाची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर एका तरुणीचे फोटो अपलोड करून बदनामीकारक मजकूर टाकला. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ लागला. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी होईल, धार्मिक तसेच जातीय तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये किंवा व्हिडिओ टाकू नयेत, असे आवाहन केले. मात्र, तरीदेखील मंगळवारी एकाने मुलीचा फोटो टाकून बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेलने आक्षेपार्ह मजकुरांचा ‘ डाटा ‘ संकलित केला असून त्यांच्यावरही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे समजते.