न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हें) :- पिंपरी चिंचवड शहरात सोमवार (दि. १९) रोजी शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या प्रवेशद्वारासमोर रांगोळ्यांचे गालिचे अंथरलेले पहायला मिळाले. निमित्त होते जागतिक शौचालय दिनाचे.
महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयातील चिंचवड स्टेशन येथील साफ शौचालय, खडी मशीन जय मल्हार नगर झोपडपट्टी काळभोरनगर, मोरवाडी घरोंदा हॉटेलच्या समोरील शौचालयाची चांगल्या पद्धतीने स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली होती. ब क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक २२ मधील स्मशानभूमी शेजारी, जाधववस्ती, वाल्हेकरवाडी, गावडे जलतरण तलावाशेजारील पांढरीचा मळा येथील सार्वजनिक शौचालये यांची साफसफाई करण्यात आली.
क क्षेत्रीय कार्यालयामध्ये नेहरुनगर, वरदहस्त सोसायटी खराळवाडी, जाधववाडी गवळीमाथा तसेच ड क्षेत्रीय मधील पिंपळे सौदागर स्मशानभूमी जवळ, दत्तमंदिराजवळ, पिंपळे गुरव येथील इंगवले आळी, वाकड गावठाण परिसरातील सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करण्यात आली. शौचालय व शौचालयाचा परिसर स्वच्छ ठेवून आपले शहर सुंदर ठेवण्यास महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.










