जकार्तामध्ये सुरू असलेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघाने उपांत्यफेरीत धडक दिली आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात भारताने थायलंडला 5-0 अशी धूळ चारली. कर्णधार राणी रामपालने हॅटट्रीक लगावली तर मोनिका आणि नवज्योत कौरने प्रत्येकी एक गोल केला. उपांत्यफेरीत भारताचा सामना चीन आणि जपान संघात होणाऱ्या सामन्यात विजयी होणाऱ्या संघासोबत होईल.
दोन्ही संघांनी सामन्याची सुरुवात सावध केली. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत (दोन क्वार्टर) दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टररमध्ये दहाव्या मिनिटाला राणीने भारताचे खाते उघडून दिले. तिसऱ्या क्वार्टरच्या समाप्तीपर्यंत भारत 1-0 आघाडीवर होता. चौथ्या क्वार्टरमध्ये सुरुवातीला राणीने संघासाठी आणि वैयक्तीक दुसरा गोल केला. त्यानंतर मोनिकाने 51 व्या आणि नवज्योतने 54 व्या मिनिटाला गोल करत संघाचा विजय पक्का केला. सामना संपण्यास पाच मिनिटं बाकी असताना राणीने आपली हॅटट्रीक पूर्ण करत संघाला 5-0 ने विजय मिळवून दिला.

















