बिहारमधील मोतीहारी पंचायत समितीच्या कथित सदस्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेपाळच्या हॉटेलमधील हा व्हिडीओ असून यात सगळी नेते मंडळी ‘टल्ली’ होऊन बारबालांबरोबर ठुमके लगावत असल्याचं दिसत आहे. बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यातील पताही या प्रांतात लवकरच प्रांत प्रमुखाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचे मुख्य उमेदवार बलदेव पासवान या व्हिडीओत दिसत आहेत. त्यांनीच ११ सदस्यांची मत आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांना नेपाळमधील एका हॉटेलात ठेवले आहे. त्याच हॉटेलमध्ये ही मंडळी आपले रंग उधळत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून ही मंडळी या हॉटेलमध्ये राहत आहेत. याचदरम्यान, दारू पिण्याबरोबरच बारबालांबरोबर त्यांच्या रासलीलाही सुरू आहेत त्याचीच काही दृश्ये या व्हिडीओत दिसत आहेत. पताही प्रांताच्या ११ पंचायत समिती सदस्यांनी प्रांत प्रमुख असलेल्या अमीरी बैठा यांच्याविरोधात १४ जुलै रोजी अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावर ६ ऑगस्टला अविश्वास प्रस्तावावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमीरी बैठा यांना आपले प्रमुखपद गमवावे लागले होते.
२७ ऑगस्टला पुन्हा एकदा पताही प्रांत प्रमुखाच्या निवडीसाठी निवडणूक होणार आहे. यामुळे मतं फुटू नयेत यासाठीच बलदेव पासवान आपल्या ११ सदस्यांना घेऊन नेपाळमधील हॉटेलमध्ये गेल्याचे बोलले जात आहे. तसेच हा व्हिडीओ व्हायरल होताच निवडणूक समितीकडे याबद्दल तक्रार करण्यात आली आहे. या पंचायत समितीमध्ये एकूण २० सदस्य आहेत. ज्यातील ११ जण पासवान यांचे समर्थक आहेत, तर इतर ९ जण माजी प्रांत प्रमुख अमीरी बैठा यांचे समर्थक आहेत.

















