न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. जुलै. २०२०) :- मराठा आरक्षण प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी रोज सुनावणी घेण्यास न्यायालयाने तयारी दर्शविली असून, त्यासाठी लेखी दावे-प्रतिदावे आणि त्यासाठी लागणारा वेळ ठरवून घेण्यास दोन्ही बाजूच्या पक्षकारांना सांगण्यात आलं आहे.
याशिवाय मराठा आरक्षण आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाच्या संदर्भात अंतरिम आदेश देण्यासाठी १५ जुलै रोजी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने यावेळी सांगितलं. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोणत्याही प्रकारे निकाल देऊ शकत नाही, असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं. न्यायालय नियमित सुरु झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देता येणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
मराठा आरक्षणाच्या विरोधात जयश्री पाटील यांची मूळ याचिका असून मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावं अशी मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवण्यासंबंधी बोलताना त्याची गरज वाटत नसल्याचं सांगितलं. या प्रकरणी दर दिवशी सुनावणी होईल, असं सांगून सर्वोच्च न्यायालयाने पुढील महिन्यात तारखा देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.












