न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (२२ नोव्हें) :- पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले आहे. या आजाराने नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे २१८ “पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या चार महिन्यापासून शहरवासियांना “स्वाईन फ्लू’ने त्रस्त केले होते. मागील महिन्यापासून “स्वाईन फ्लू’ आजार आटोक्यात आला आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूने कहर केला आहे. नोव्हेंबर महिन्यात बदलणाऱ्या वातावरणामुळे ४ हजार ५७० तापाचे रुग्ण आढळले आहेत, यामध्ये, डेंग्यूच्या ८५९ संशयित रुग्णापैकी २१८ “पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरुन दिसून येते. तसेच, ऑक्टोबर महिन्यात १०५ रुग्ण आढळले आहेत. मलेरियाचा नोव्हेंबर महिन्यात एक “पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळला आहे. या वर्षी नोव्हेंबर महिनाअखेर डेंग्यूचे ४२६ रुग्ण तर मलेरियाचे २६ रुग्ण आढळले आहेत.
पावसाळा संपल्यानंतरही शहरातील काही भागात कचरा, तुंबलेली गटारे, सतत वाहनारी सांडपाणी यामुळे किटकजन्य आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यातील वीस दिवसात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यातील डेंग्यूची वाढती संख्या चिंतेची बाब ठरत आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाकडून नियमित धूर फवारणी व औषध फवारणी होत नसल्याने किटकजन्य आजारात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.