न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी :- प्राधिकरण हद्दीतील भोसरी भागातील भगत वस्ती, धावडे वस्ती, गुळवे वस्ती परिसरातील अनियमित बांधकामे नाममात्र दंड आकारून नियमित करण्यात यावीत अशी मागणी भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगे व रवी लांडगे यांनी प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब लांडगे, सोमनाथ लांडगे, रोहिदास वाबळे, हनुमंत तावरे, दत्तात्रय लांडगे, श्रीकृष्ण तावरे, अर्जुन केसरी, अशोक वाघमारे, राजकुमार गोंड, दशरथ पवळे, कांतीलाल रणपिसे, तानाजी भोंडवे, सुनील भोपळे, अजित जाधव आदी उपस्थित होते.
यात प्राधिकरण हद्दीतील मिळकती पुर्ण मोबदला देवून खरेदी केल्या आहेत. त्याबाबतचे दस्त देखील आहेत. मात्र, तांत्रिक बाबींमुळे या मिळकतींवर बांधकामास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे स्वःमालकीच्या मिळकती असूनही त्यावर स्वखर्चाने उभारलेली बांधकामे अनधिकृत ठरत आहेत. काही जणांनी कर्ज काढून मिळकती घेतल्या व त्यावर बांधकाम केले. काहींनी दागिने मोडले. तर काहींनी गावाकडील मिळकती विकून याठिकाणी मिळकत खरेदी केली आहे.
गरीब कामगार, अल्प उत्पन्न गटातील नागरीक व मजुरी करुन उपजिविका करणाऱ्या कामगारांनी याठिकाणी घरे बांधली आहेत. या बांधकामांना महापालिकेने नागरी सुविधा पुरविल्या आहेत. त्यांच्याकडून मिळकत कर, पाणीपट्टी व इतर प्रकारचे सर्व कर वसूल केले जातात. प्राधिकरणाकडून ही बांधकामे नियमित केली जात आहेत. मात्र, त्यासाठी आकारले जाणारे शूल्क अवाजवी व अन्यायकारक आहे. पीएमआरडीएने अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी पाच टक्के इतका दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर प्राधिकरणाने पाच टक्के दंड आकारुन ही घरे नियमित करावीत, अशी मागणी नगरसेवक राजेंद्र लांडगे व रवी लांडगे यांनी केली आहे.
















