न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जुलै. २०२०) :- जुनी सांगवी परिसरात रात्री दोनच्या सुमारास १५ वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. गुरुवारी (दि. २३) पहाटे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दारुच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत वृत्त असे की, जुनी सांगवी परिसरातील ढोरेनगर, समतानगर, मुळानगर, पवनानगर, प्रियदर्शनीनगर अशा सुमारे दोन किलोमीटर परिसरात तीन संशयित आरोपी यांनी पंधरावर खासगी वाहनांच्या काचा फोडून व वाहनांचे नुकसान केले.
यात एक रुग्णवाहिका, स्कूलबस व इतर चारचाकी वाहनांचा समावेश आहे. संगमनगर, पवनानगर व खडकी येथील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील एकावर यापूर्वी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वाहन तोडफोडप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.