न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. जुलै. २०२०) :- मुस्लीम बांधवाकडून बकरी ईद ( ईद – उल – अजहा ) दि. ०१/०८/२०२० रोजी साजरी होत असून या सणानिमित्ताने लहान – मोठ्या जनावरांची कुर्बानी करण्याची प्रथा आहे. कोविड १९ मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय शासनाद्वारे घेण्यात आलेला आहे. त्यानुसार बकरी ईद साजरा करण्याबाबत महापालिकेने मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत.
कोविड १९ मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांत बंदी आहे. त्यास अनुसरून बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरीकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. प्रतिबंधित ( Containment ) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
बकरी ईदच्या निमित्ताने नागरीकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये. कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेद्वारे विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे आवश्यक राहिल. महानगरपालिकेद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार साध्या पद्धतीने बकरी ईद साजरी करावयाची असून प्रतिकात्मक कुर्बाणी करण्यात यावी तसेच कुठेही गर्दी होणार नाही याची उचित दक्षता घ्यावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.