न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नवे कारभारी म्हणून अतुल आडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. या ठिकाणी असणारे विनोद सगरे यांना पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात पुन्हा पाठवण्यात आले आहे. त्यांच्याकडे या पदाचा अतिरीक्त पदभार होता.
दरम्यान, आडे यांची थेट नागपूर येथून शहरात बदली करण्यात आली आहे. एप्रिल २००७ मध्ये नागपूर येथील आरटीओ कार्यालयात सहायक परिवहन अधिकारी म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर त्यांची बदली गडचिरोली आरटीओ कार्यालयात करण्यात आली. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर, भंडारा आणि अकोला येथे काम पाहिले. त्यांची आता पिंपरी – चिंचवड उप प्रादेशिक परिहवन कार्यालयात बदली करण्यात आली आहे.
याबाबत अतुल आडे यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामावर मर्यादा आल्या आहेत. मात्र, नागरिकांची कामे लवकर व्हावीत यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी काही बदल करण्यात येणार आहेत.














