- स्थायी सभेत एका गटामुळे भाजपच्याच इतर सदस्यांवर पराभूत होण्याची वेळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट. २०२०) :- शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्या वाकड, ताथवडे, पुनावळे प्रभाग क्रमांक २५ मधील रस्ते व अन्य विकासकामे असे सुमारे ७५ कोटी रुपये तर शाळा इमारत उभारणीचा सुमारे २४ कोटी रुपयांचा विषय पालिकेच्या स्थायी समितीच्या पत्रिकेवर होता. महापालिकेची स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. संतोष लोंढे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष आजच्या स्थायीच्या सभेत पहावयास मिळाला.
दरम्यान या विकासकामांना आमदार जगताप समर्थक नगरसेवकांनी विरोध केला होता. त्यामुळे या कामांसाठी मतदान घेण्यात आले. जगताप समर्थक नगरसेवकांमध्ये शशिकांत कदम, अभिषेक बारणे, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, आरती चोंधे या पाच सदस्यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या बाजूने भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे गटाचे राजेंद्र लांडगे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, विजय उर्फ शीतल शिंदे, राष्ट्रवादीचे मयूर कलाटे, पंकज भालेकर, सुलक्षणा धर यांनी मतदान केले. त्यामुळे प्रस्ताव पाच विरुद्ध आठ मतांनी मंजूर झाल्याचे समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी जाहीर केले. प्रस्ताव मंजूर होताच जगताप समर्थक पाचही नगरसेवकांनी सभात्याग केला. वाकड येथील शाळा इमारतीचा विषयास देखील मंजूर देण्यात आली.
ऐनवेळी भाजपच्याच व आमदार महेश लांडगे गटाच्या स्थायी सदस्यांनी राहुल कलाटे यांना साथ देत, आमदार जगताप गटाच्या नगरसेवकांवर पराभूत होण्याची व सभात्याग करण्याची वेळ आणली. अखेर विकासाचा विजय झाला आणि राहुल कलाटे यांच्या प्रभागातील कामांना मंजुरी मिळाली.
मागील सभेत विविध रस्ते व शाळेच्या विषयाला भाजपच्या सदस्यांनी विरोध करीत ते विषय १५ दिवस लांबणीवर टाकण्याची मागणी करीत स्थायी सभा तहकूब केली होती. निव्वळ राजकीय द्वेषापोटी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक सदस्य विरोध करीत आहेत, असा आरोप शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी त्यावेळी केला होता.














