न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. ऑगस्ट. २०२०) :- १५ ऑगस्ट रोजी स्वांतत्र्यदिनाची सार्वजनिक सुट्टी असल्याने दरवर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणावर लोणावळ्यात गर्दी करतात. मात्र, यंदा करोनाचं संकट असल्याने पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांना लोणावळ्यात येण्यास सुरुवातीपासूनच मनाई करण्यात आली आहे.
मात्र, आता १५ ऑगस्ट रोजी कोणीही लोणावळ्यात येऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. जर पोलिसांची नजर चुकवून याठिकाणी आलेलं कोणी आढळल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
यावर्षी १५ ऑगस्ट शनिवारच्या दिवशी येत असून दुसऱ्या दिवशी रविवार आहे. त्यामुळे लागून सलग दोन दिवस सुट्ट्या असल्याने या दोन्ही दिवशी लोणावळ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन लोणावळा पोलिसांनी हे आवाहन केले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली.














