न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. ऑगस्ट. २०२०) :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुशांतसिंह राजपूतप्रकरणी फटकारल्यानंतर पार्थ पवार हे शनिवारी दुपारनंतर बारामतीत आले. बारामतीजवळ कन्हेरी येथे काका श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यावर ते थांबले. दरम्यान शनिवारी रात्री उशिरा पार्थ यांची नाराजी दूर करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, काका श्रीनिवास, काकी शर्मिला व पार्थ यांच्या मातोश्री सुनेत्रा हे उपस्थित होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पक्षाच्या धोरणाविरोधात भूमिका घेतल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पार्थ यांना गेल्या आठवड्यात फटकारले. नातू इमच्युअर असून त्याच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नसल्याचे पवार म्हणाले होते. तेव्हापासून पार्थ काही वेगळा निर्णय घेतील असे बोलले जात होते. मुंबईतील सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी ते गेले होते, परंतु शरद पवार यांच्याशी भेट झाली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या साऱ्या प्रकारानंतर शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पार्थ हे काका श्रीनिवास यांच्या कन्हेरीतील अनंतारा या बंगल्यावर पोहोचले. पार्थ हे भोजनासाठी आले असून ही आमची कौटुंबिक भेट असल्याचे त्यावेळी काकी शर्मिला यांच्याकडून सांगण्यात आले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी नेहमीप्रमाणे बारामतीत विविध विकासकामांना भेटी देत पाहणी केली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. परंतु त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. मला माझे काम करू द्या, एवढेच पवार बोलले. या बैठकीत नाराज पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याचे समजते. विश्वसनीय सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला. त्यामूळे तूर्तास तरी घडामोडी दिलेल्या थंडावल्या आहेत.














