न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. ऑगस्ट. २०२०) :- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना सध्या एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळण्यात येते. त्यामुळे नातेवाईकांना मृतांच्या चेहऱ्याचे अंतिम दर्शन होत नाही. तसेच मृतदेहाची अदलाबदल होण्याची शक्यताही असते. हे टाळण्यासाठी मृतदेहाच्या चेहऱ्याच्या ठिकाणी पारदर्शक प्लास्टिक असलेल्या बॅगा वापराव्यात, असे पत्र आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सर्व जिल्हयांना व महापालिकांना पाठवले आहे.
कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाच्या माध्यमातून संसर्ग होण्याची शक्यता असल्याने तो थेट नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत नाही. जेथे मृत्यू झाला आहे, तेथील जवळच्या स्मशानभूमीत महापालिकेच्या वतीने दहन करण्यात येते. त्यापूर्वी तो मृतदेह पिशवीत गुंडाळण्यात येतो.
अंत्यविधी करताना केवळ २० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मृतदेह गुंडाळण्याची बॅग अपारदर्शक असल्याने नातेवाईकांना मृतदेहाचे मुखदर्शन होत नाही. तो मृतदेह त्यांचाच आहे का हेदेखील त्यांना कळत नाही. नातेवाईकांच्या भावनेशी संबंधित हा विषय असतो. मुंबई आणि ठाण्यात मृतदेहांची अदलाबदल झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत, असे होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे.














