न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. ऑगस्ट. २०२०) :- करोनाबाधित रुग्णांवरील उपचाराकरिता जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेले रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. मात्र, पिंपरी – चिंचवड महापालिकेने खरेदी केलेली रेमडेसिवीर इंजेक्शन स्वीकारण्यास पालिकेच्याच भोसरी रुग्णालयाने नकार दिला आहे.
वायसीएम रुग्णालयाच्या वतीने दिलेली व्हाईल्स परत पाठविण्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी – चिंचवड शहरातील करोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिका रेमडेसिवीर इंजेक्शनच्या ८ हजार १०० व्हाईल्स खरेदी करणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या या इंजेक्शनच्या वापरामुळे शहरातील करोनाबाधितांच्या मृत्यूदरावर नियंत्रण आणण्यासाठी २ कोटी ७४ लाख ७९ हजार ८८ रुपयांच्या खरेदीचा प्रस्तावास स्थायी समितीच्या बुधवारी (दि. ५) झालेल्या सभेत मान्यता देण्यात आली आहे. महापालिकेने खरेदीसाठी ऑर्डर दिल्यानंतर ८१०० पैकी ११०० रेमडेसिवीर इंजेक्शन्स वायसीएम रुग्णालयाच्या मध्यवर्ती भांडारला प्राप्त झाली आहेत.














