न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- पोलिसांना एक संशयित कार (एमएच १४ जी वाय ६०६०) आढळली. पोलिसांनी कार थांबवून बघितले असता, कारमध्ये २००० रुपयांच्या १४९ बनावट नोटा आढळून आल्या.
बनावट नोटा आरोपींनी चक्क जमिनीच्या व्यवहारासाठी उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी वापरले असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी २००० च्या १४९ नोटा आणि कार असा एकूण ७ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. विशेष म्हणजे निगडी येथील घरातच या आरोपींनी नोटांचा छापखाना सुरु केला होता.
हा प्रकार रविवारी (दि. १६) रात्री साडेदहा वाजता आकुर्डी येथील खंडोबा माळ येथे उघडकीस आला. पोलीस शिपाई शहाजी वसंत धायगुडे यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक प्रदीप कटारिया (वय २०, रा. आनंद पार्क, थेरगाव), ओंकार शशिकांत जाधव (वय २०, रा. कुणाल इस्टेट, केशवनगर, चिंचवड), सुरेश भगवान पाटोळे (वय ४०, रा. ओंकार नगर, पाटेवस्ती, आनंदवन आश्रम, फुगेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ४८९ (ब), ४८९ (क) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे तपास करीत आहेत.














