- मंडळांकडून ऑनलाईन दर्शनासाठी फेसबुक, यु ट्यूब, संकेतस्थळाचा वापर व्हावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. नियमांची अमंलबजावणी करत सण साजरा करावा. तसेच मर्यादित मंडप व सजावट करावे, असे आवाहन पिंपरी – चिंचवड महापालिका व पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित संयुक्त बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले.
चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात सोमवारी (दि. १७) झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. या वेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, पोलिस अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शनिवार (दि. २२) पासून सुरू होणारा गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा याबाबत राज्याच्या गृह विभागाने आदेश दिले आहेत. त्यासाठी पिंपरी – चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक झाली. मोठ्या मंडळांनी ऑनलाईन दर्शन देण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी फेसबुक, यु ट्यूब, संकेतस्थळ याचा वापर करावा. स्क्रीनिंगची व्यवस्था करावी. मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे. प्रत्यक्ष दर्शन घेऊ इच्छिणारे नागरिक नियमांचे वेळ पालन करतात का याबाबत दक्षता घेणे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे थर्मल स्क्रीनिंग करणे, त्यांना सॅनिटायझरची सोय करून द्यावी, आदी सूचना मंडळांना देण्यात आल्या.














