न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- देशामध्ये करोनाने थैमान घातले आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच मृतांचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत देशामध्ये सुमारे ५१ हजार रुग्णांचा बळी गेला आहे. त्यापैकी १.५४ टक्के मृत्यू हे एकट्या पिंपरी चिंचवड शहरातील आहेत.
देशात लहान – मोठी सुमारे चार हजार शहरे आहेत. परंतु पिंपरी – चिंचवड आता करोनाचा सर्वाधिक उद्रेक असणाऱ्या शहरांमध्ये समाविष्ट झाले आहे. शहरातील करोनाबाधितांच्या मृत्यूची आकडेवारी इतक्या वेगाने वाढत आहे की, हे शहर आता देशातील राज्यांसोबत स्पर्धा करु लागले आहे.
देशातील एकूण ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी केवळ नऊ राज्यांमध्ये पिंपरी – चिंचवड शहरापेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. तसेच एकूण कोनाबाधितांच्या संख्येतही पिंपरी – चिंचवड शहरापेक्षा केवळ दहा राज्ये पुढे आहेत. आतापर्यंत शहरात ७८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण मृत्यूपैकी ५.७७ टक्के मृत्यू शहरामध्ये झाले आहेत. तर देशातील एकूण करोना मृत्यूपैकी १.५४ टक्के मृत्यू हे एकट्या पिंपरी चिंचवडमध्ये झाले आहेत.














