- ५१.५ टक्के लोकांमध्ये आढळले कोरोनाशी लढा देणारी ‘आयजीजी अँटिबॉडीज’
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- पुण्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळलेल्या पाच प्रभागांमध्ये ५१.५ टक्के नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन गेल्याचा निष्कर्ष विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. या पाच प्रभागांत ३ लाख ६६ हजार ९८४ नागरिक राहात असून तेथील १,६६४ नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले. त्यांच्या रोगप्रतिकारशक्तीची चाचणी केल्यानंतर ५१.५ टक्के लोकांमध्ये कोरोनाशी लढा देणारी ‘ आयजीजी अँटिबॉडीज ‘ ( प्रतिपिंडे ) आढळून आली, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव आणि आयसर संस्थेचे अर्णब घोष यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसर), ट्रान्सलेशन स्वास्थ्य आणि तंत्रज्ञान संस्था, फरिदाबाद आणि ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय, वेल्लोर या संस्थांतील संशोधक, वैज्ञानिक, साथीचे रोगविशेषतज्ज्ञ यांनी २० जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान हा सिरो सर्व्हे केला आहे. पुणे विद्यापीठाच्या प्रधान संशोधक आरती नगरकर, आयसरचे अर्णब घोष यांनी याचे नेतृत्व केले.
पुणे शहरातील नागरिकांमध्ये कोरोना विषाणूंशी लढा देणारी रोगप्रतिकारशक्ती ( अँटिबॉडी ) किती प्रमाणात तयार झाली आहे, किती टक्के नागरिकांना संसर्ग होऊन गेला आहे, हे पाहण्यासाठी हा सिरोसर्व्हे करण्यात आला. प्रारंभीच्या काळात शहरातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळलेल्या पाच प्रभागांची निवड या सर्व्हसाठी करण्यात आली. त्यामध्ये येरवडा, कसबा – सोमवार पेठ, रास्ता रविवार पेठ, लोहियानगर – कासेवाडी आणि नवी पेठ- पर्वतीचा यात समावेश आहे.
जागतिक अभ्यासानुसार सर्वकष चाचण्या केल्या नसतील, तर जास्त संख्येने असलेले लक्षणेविरहित कोरोनाग्रस्त त्यात सापडत नाहीत. एखाद्या क्षेत्रातील नागरिकांचे संसर्गाचे प्रमाण व त्याचे विविध पैलू तपासण्यासाठी सिरॉलॉजिकल टेस्टिंग ( सिरो ) महत्वाचे साधन ठरते. त्यामुळे पुण्यात हा सर्व्हे करण्यात आला. या प्रभागात सर्वेक्षणात २० ते २४ जुलैदरम्यान येरवडा प्रभागातील ३६७ नागरिक, २५ ते २८ जुलैदरम्यान लोहियानगर कासेवाडी प्रभागातील ३१२ जण, २९ ते ३१ जुलैदरम्यान रास्ता – रविवार पेठेत ३३५ नागरिक, ३१ जुलै ते ३ सोमवार ऑगस्टदरम्यान कसबा पेठेतील ३५२ नागरिक, तसेच चार आणि पर्वती प्रभागात २९८ नागरिकांच्या रक्तांचे नमुने घेऊन चाचणी करण्यात आली.
लोहियानगर – कासेवाडीत मध्य भागातील सुरवातीला संसर्ग झालेल्या लोहियानगर- कासेवाडी भागात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाल्याचे या सर्व्हेत निदर्शनास आले. तेथील ३१२ नमुन्यांपैकी ६५.४ टक्के ३ नमुन्यांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या. सर्वात कमी अँटीबॉडीज कसबा- सोमवार पेठ प्रभागात आढळून आल्या. त्याचे प्रमाण ३६.१ टक्के आहे.
झोपडपट्ट्यांतील रहिवाशांना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाल्याचे आढळले. झोपडपट्टी, चाळ, सोसायटी (अपार्टमेंट) आणि बंगले (स्वतंत्र घरे) या चार ठिकाणी हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये झोपडपट्ट्यांतील ६०० पैकी ६२ टक्के नमुन्यांत कोरोना अँटीबॉडीज आढळून आल्या. चाळीतील ५३६ नमुन्यांपैकी ५६२, सोसायट्यांमधील ४४६ नमुन्यांपैकी ३३.२ आणि बंगल्यातील ८२ नमुन्यांपैकी ४३.९ टक्के लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याचे चाचणीत आढळले.














