न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. ऑगस्ट. २०२०) :- सध्या जैन समाजाचे पर्युषण महापर्व सुरू आहे. यंदा करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जैन स्थानकांमध्ये गुरू महाराजांचे प्रवचन व अन्य धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. मात्र, जैन बांधव घरबसल्या गुरु महाराजांचे ऑनलाइन प्रवचन व अन्य धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेत आहेत.
जैन श्वेतांबर पंथीयांच्या पर्युषण पर्वाला सुरवात झाली आहे. जैन समाजात पर्युषण महापर्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पर्व काळात विविध प्रकारच्या तपसाधना करण्यावर जैन भाविक भर देतात. जैन बांधवांच्या घरोघरी उपवास, एकासना, बेयासणा, आयंबिल आदी तपसाधना सुरू झाल्या आहेत.
अष्टदिवसीय प्रवचन, नवकार महामंत्र जाप, अंतगढ सूत्रवाचन, कल्पसूत्र वाचन, प्रतिक्रमण आदींचे यूट्यूबवर ऑनलाइन प्रक्षेपण सुरू आहे. त्याचा घरबसल्या जैन भाविक लाभ घेत आहेत. त्याशिवाय, सामायिक, पौषध आदी साधना देखील सुरू आहेत. येत्या शनिवारी (दि. २२) संवत्सरी पर्वाच्या दिवशी दुपारी १२ वाजता ऑनलाइन आलोयणा पाठ आणि सूर्यास्तानंतर प्रतिक्रमण दाखविण्यात येणार आहे. विविध जैन संघांनी गुरू महाराजांचे वास्तव्य आहे, तिथून नियोजन केले आहे.











