न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. ऑगस्ट. २०२०) :- केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०’ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. स्वच्छ शहरांच्या यादीत देशात पिंपरी चिंचवड शहराला २४ वा क्रमांक मिळाला आहे. गतवर्षीपेक्षा यात सुधारणा झाली आहे. तर राज्यात शहर ७ व्या क्रमांकावर पोहोचले आहे.
इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता.
केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईसह इतर शहरांचाही समावेश आहे. यामध्ये नाशिक ११, ठाणे १४, पुणे १५, नागूपर १८, कल्याण डोंबिवली २२, पिंपरी चिंचवड २४, औरंगाबाद २६, वसई-विरार ३२ आणि मुंबई ३५ व्या क्रमांकावर आहे.














