न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली (दि. १९. ऑगस्ट २०२०) :- युवा पिढीच्या नोकरीसंदर्भात मोदी सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून राष्ट्रीय भरती संस्था (National Recruitment Agency) स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा (CET) देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल.
शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी युवा पिढी अनेक मार्ग चोखाळते. प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपापल्या परीक्षा ठेवतात आणि चांगल्या नोकरीच्या महत्त्वाकांक्षेने तरुण या सगळ्या परीक्षा देतात. आता मोदी सरकारने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे हे चित्र पालटण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.
आता राष्ट्रीय भरती एजन्सी तयार झाल्याने विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होतील, त्यांचे पैसेही वाचतील आणि मानसिक आरोग्यही ठीक राहील. आता परीक्षा देण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही. केवळ एकच परीक्षा दिल्यानंतर तरुणांना आणखी पुढे जाण्याची संधी मिळेल असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.














